‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

tuzyat jiv rangla

टीम महाराष्ट्र देशा: राणा दा आणि पाठक बाईंची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचली आहे. या मालिकेतील राणा दा चा ‘चालतंय की’ हा संवाद जितका लोकप्रिय ठरला तितकेच इतर संवाद सुद्धा लोकप्रिय ठरले आहेत. मात्र आता या मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नंदिता वहिनीच्या तोंडी शिक्षकांविषयी असलेले संवाद आता या मालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

मालिकेत वारंवार उच्चारल्या जाणाऱ्या काही संवादांमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होतेय, असा आक्षेप घेत शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय. मालिकेत शिक्षिकेच्या भूमिकेतील पाठक बाईंना सतत मास्तरीन, मास्तरडी म्हणणे असो किंवा इतर शिक्षकांचा उल्लेख मास्तुरड्या, दीमदमडीचे मास्तरडे असा झालेला असो; या सगळ्याच संवादांवर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय.

ही समस्या गंभीर असल्याचं शिक्षकांचं मत आहे. मुलांवर असे संस्कार होत राहिले तर भविष्यात ते शिक्षकांचा आदर करणार नाहीत, अशी भीतीही काही शिक्षकांनी व्यक्त केलीय.