अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?

औरंगाबाद : एका प्रकरणामुळे शिवसेनेच्या संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे बंजारा समाज महाविकास आघाडी सरकावर नाराज झाल्याचे चित्र तयार झालेय. या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पोहरादेवीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाहीये. या अनुषंगाने नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी पोहरादेवीच्या माध्यमातून राज्य सरकारने प्रयत्न तर केला तर नाही अशी चर्चा सध्या होत आहे.

संजय राठोड हे बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. शिवसेनेचा बंजारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. यवतमाळ सह विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचे मोठे समर्थक आहेत. २००४ आणि २००९ साली यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. २०१४ साली भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रिपद मिळाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. २००४ ते २०१९ असे सलग चौथ्यांदा ते निवडूण आलेत.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्री करून वनमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, आता या ‘स्ट्राँग’ नेत्याला राजीनामा द्यावा लागल्याने बंजारा समाज महाविकास आघाडी सरकारवर नाराज झाला आहे. समाजाच्या मते संजय राठोड यांना ‘नाहक’ त्या प्रकरणात गोवण्यात आले आहे.

त्यानंतर आज पोहरादेवी गडाबाबत अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. ते विधानसभेत म्हणाले की, ‘बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले जगद्गुरू संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी (ता.मानोरा, जि.वाशिम) या धार्मिक स्थळाच्या विकास आराखड्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ती पूर्ण करण्याकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल’ अशी माहिती पवार यांनी दिली. पोहरादेवीसह राज्यातील अनेक तिर्थक्षेत्रांबाबत त्यांनी मोठ्या घोषणा केल्यात. दरम्यान, पोहरादेवीच्या विकासकामांच्या माध्यमातून सध्या बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

IMP