संघाशी सबंध जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न – अण्णा हजारे

अहमदनगर / स्वप्नील भालेराव : मला व आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेवून इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्या हाती या आंदोलनाची सर्व सुत्रे अण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेली दोन तीन दिवस चर्चेत आहेत. वास्तविक पहाता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधीही परिचय नव्हता.आंदोलन सुरू होणार म्हणून विविध राज्यातील जे कार्यकर्ते पुढे आले त्यामध्ये कल्पना इनामदार होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सुत्रे सोपवलेली नव्हती. समन्वय समितीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची जी कामे विभागून घेतली गेली त्यानुसार कल्पना इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी हाती घेतली.

या आंदोलनाची सर्व सुत्रे मी स्वतः हाताळत होतो. मात्र आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कट कारस्थानामुळे कल्पना इनामदार यांना नथुराम गोडसेंशी जोडले गेले तसेच कल्पना इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी सबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याची सुद्धा बदनामी करणाऱ्या चौकटीला भानच राहीलेले नाही. असेही अण्णा बोलले.

आमच्या आंदोलनामुळे राज्यातील प्रमुख पक्ष पार्ट्यांच्या मंत्र्यांना ते भ्रष्ट ठरल्याने त्यांना घरी जावे लागले .त्यात सर्वच पक्षाचे मंत्री आहेत. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना आंदोलनामुळे भ्रष्ट करून सदर पक्षाची मोठी हानी झालेली आहे.हे नाकारता येत नाही.पण स्वतः भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत.

आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरावे तर चावते आणि सोडावे तर पळते ‘ अशी अवस्था झाली आहे.बरेच लोक मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला बदनामीची फीकीर नाही. अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या लोकांविरूद्ध लवकरच उच्च न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.

You might also like
Comments
Loading...