तहसीलदारास जाळण्याचा प्रयत्न, वाळू चोरांविरूध्द गुन्हा दाखल

valu mafiaya

अहमदनगर  : पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथे कुकडी नदीच्या पात्रात वाळू चोरी रोखून कारवाई करीत असलेल्या तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचा-यांच्या अंगावर डिझेल फेकून वाळू चोरांनी त्यांना पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित पोलीस कर्मचा-याने वाळू चोराच्या हातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात 10 जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोकलेन मशीन सहीत पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून वाळू चोरांविरूध्द प्रशासनाने खंबीर भूमिका घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

कुकडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार भारती सागरे आपल्या सहकारी कर्मचा-यांसह कोहोकडी येथे पोहोचल्या. त्यावेळी दोन पोकलेन मशीन व 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून वाळू उपसण्याचे काम सुरू होते. तहसीलदार सागरे पोहोचताच कारवाईला सुरूवात केली.

त्यावेळी वाळू चोरांनी त्यांना विरोध करीत वाहने पळवून नेण्यास सुरूवात केली. म्हणून सागरे यांनी एका पोकलेन मशीनचा ताबा घेऊन स्वत: ते चालविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाळू चोरांपैकी एका तरूणाने आपण शिरूर तालुक्यातील अण्णापूरच्या माजी सरपंचाचा मुलगा असून ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगत कारवाईला विरोध केला. तसेच पोकलेनमधील डिझेल काढून ते स्वत:च्या अंगावर तसेच तहसीलदार भारती सागरे व अन्य कर्मचा-यांच्या अंगावर फेकले. खिशातून काडीपेटी काढून आता मी स्वत:ला पेटवून घेतो व तुम्हालाही पेटवून देतो असे म्हणून या तरूणाने काडी पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी गंगाधर फसले यांनी त्याच्या हातातून काडीपेटी हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

त्या वेळी तलाठी गायकवाड यांनी तहसीलदार सागरे यांना पोकलेन मशीनवरून खाली उतरविले.मात्र गोंधळाचा फायदा घेऊन वाळू चोर वाहनांसहीत तेथून पळून गेले. पारनेर मध्ये तहसीलदार सागरे यांनी या प्रकाराची माहिती पत्रकारांना दिली.

त्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात तहसीलदार सागरे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या अनुषंगाने बेकायदा जमाव जमविणे व खुनाचा प्रयत्न केल्याचा हुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व त्यांचे सहकारी पळून गेलेल्या वाळू चोरांचा शोध घेत आहेत.