वैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटना गंभीर; जखमींच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न करा – धनंजय मुंडे

munde

मुंबई : वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून १५ कामगार भाजल्याची घटना अतिशय गंभीर आहे. यातील अनेक कामगार अत्यवस्थ असून या जखमी कामगारांना तातडीने चांगल्यात चांगले उपचार मिळावेत आणि त्यांचे जीव वाचावेत यासाठी प्रशासन आणि कारखान्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून १५ कामगार भाजल्याची घटना आज दुपारी घडली. यातील अत्यवस्थ 7 कामगार लातूर येथे काही अंबाजोगाई येथे तर काही परळी येथे उपचार घेत आहेत. घटना समजताच वर्धा दौ-यावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला व रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली शर्तीचे प्रयत्न करा पण या कामगारांचे जीव वाचवा अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याना त्यांनी तातडीने जखमींना मदत करण्याच्या सूचना दिल्याने जि.प. सदस्य अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, सभापती सूर्यभान मुंडे व इतरांनी रूग्णालयात धाव घेतली व मदत कार्यात सहभाग घेतला. ही घटना अतिशय दुर्दैवी व गंभीर आहे. या घटनेस जबाबदार कोण, घटना कशी घडली याची चर्चा नंतर करता येईल आता मात्र जखमींना बरे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या जखमींवर आवश्यकता असल्यास मोठ्या शहरातील चांगल्या रूग्णालयात उपचार करावेत असे मुंडे म्हणाले.