मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. गेल्या ११ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला आठवडाभरात सुनावणी करून लवकरात लवकर निर्णय देण्यास सांगितले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती एनजे जमादार यांनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मंजूर केला असून त्यांना दिलासा दिला आहे.
अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्यमेव जयते…! सत्याचा अखेर विजय झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटेनाटे आरोप झाले होते. मात्र, न्यायालयाने आज आम्हाला न्याय दिला आहे. न्यायालयाचे खूप खूप आभार”अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पण, आम्हाला आणखी यापुढेही लढाई लढावी लागणार असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे आम्हाला आज न्यायालयाने न्याय दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी आम्ही ही लढाई पुढे चालू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अडचणीच्या काळात जे जे लोक त्यांच्यासोबत उभे राहिले त्यांचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी आभार मानले.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. ईडीने अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांनी मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सुमारे ४.७ कोटी रुपये गोळा केले. यासोबतच देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेली रक्कम नागपुरातील श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक ट्रस्टला पुरवल्याचा आरोप ईडीने केला होता. या तपासादरम्यानच देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | राहुल गांधी पंतप्रधान नाही, विको वज्रदंतीचे अॅम्बेसिडर नक्की होतील- अतुल भातखळकर
- Rishabh Pant | ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने दिला ‘फ्लाइंग किस’! म्हणाली…
- Keshav Upadhye | “भुजबळ सरस्वतीच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणार आणि राष्ट्रवादी थेट कार्यालयात…” केशव उपध्ये यांचा टोला
- Election Commission | शिवसेना कुणाची? निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये, दोन्ही गटाकडे केली ‘ही’ मागणी
- Anil Deshmukh | मोठी बातमी! अनिल देशमुखांची दिवाळी गोड होणार?, न्यायालयाकडून जामीन मंजूर