Video: अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देत डॉ अजय चंदनवाले ससूनचे डीन; तृप्ती देसाई यांचा आरोप

डॉ चंदनवालेंना जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचा वरदहस्त - देसाई 

पुणे:  डॉ अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र देत ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता म्हणून नेमणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत देसाई यांनी डॉ चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र बनवत शासन आणि अपंगांची फसवणूक केली असल्याने, मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

पुढे बोलताना देसाई म्हणाल्या की, डॉ. चंदनवाले कोठेही अपंग असल्याचे दिसत नाहीत, आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले आणि ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक करून घेतली. तसेच कोणत्याही पदावर 3 वर्षाच्यावर राहत येत नाही मात्र मागील 7 वर्षांपासून ते एकाच पदावर काम करत आहेत .

चंदनवाले हे जळगावचे असल्याने आधी भाजप नेते एकनाथ खडसे आणि आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा  त्यांना वरदहस्त आहे, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं आरोपही देसाई यांनी केला आहे. डॉ. चंदनवाले यांच्याकडे दुचाकी आणि चारचाकीचे लायसन्स आहे, मग अपंग असताना ते गाडी कशी चालवू शकतात असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. दरम्यान,  तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांविषयी डॉ अजय चंदनवाले यांना विचारलं असता त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.