एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग स्वीकारणार – विष्णू सवरा

मुंबई : ‘मिशन शौर्य’ मध्ये आश्रमशाळेतील दहापैकी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. दि. १६ मे रोजी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनिषा धुर्वे या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. त्यांनी केलेल्या या उत्तुंग कामगिरीबदल या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील उच्चशिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

आदिवासी मुलामुलींमधील उपजतच असलेल्या काटक व कणखरपणाला वाव मिळावा, साहसी खेळासोबतच त्यांच्यातील कलागुणांचादेखील विकास व्हावा यासाठी लवकरच सर्वंकष धोरण बनविण्याचा विचार सुरू असल्याचेही श्री.सवरा यांनी सांगितले.

मिशन शौर्यमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे विभागाची प्रतिमा उंचावणार असल्याचे तसेच भविष्यात ही अशा पद्धतीच्या धाडसी मोहिमांचे आयोजन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करण्याचा विचार असल्याचे ही त्यांनी सांगितले. ११ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांच्या एव्हरेस्ट मिशनला सुरवात झाली होती. २८ मे रोजी हा संपूर्ण चमू मुंबईत पोहोचला. ४५ दिवसांच्या या मोहिमेत या विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांची संपूर्ण कसोटी लागली.

दि.३१ मे रोजी या मोहिमेतील सर्व सहभागी विद्यार्थी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. तर १जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या मुलांनीदेखील ही मोहिम यशस्वी केली. त्यामुळे विभागातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना २५ लाख रुपयांचे तर बेसकॅम्प पर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना दहा लाख रूपये रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले. यावेळी या विद्यार्थ्यांपैकी मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, कविदास कातमोडे, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया अत्राम यांनी मोहिमेदरम्यानचे थरारक,रोमहर्षक अनुभव सांगितले.

प्रशिक्षक बिमला नेगी- देऊस्कर,अविनाश देऊस्कर,शेखरबाबु,डॉ. वाईकर यांनीही या मुलांच्या एव्हरेस्ट मोहिमेचा प्रवास यावेळी उलगडून दाखवला.

विकास खऱ्या अर्थाने हिरो….
वेगवान वारे,थंड हवामान,बर्फ या सगळयामुळे आकाश या विद्यार्थ्याला त्रास झाला. तेव्हा टीम स्पिरीट दाखवत त्याला पुन्हा घेऊन ॲडव्हॉन्स बेस कॅम्प वर सुखरूप आणून विकास सोयामने परत जावून शिखर सर केले..त्यामुळे तोच या मोहिमेचा खरा हिरो असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगितले