शस्त्रधारी गुन्हेगार वाहनासह गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंगाबाद : मुंबईत पिस्टल लावून दरोडा टाकणा-या चौघांना शस्त्रासह गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. अटकेत असलेल्या चौघांच्या ताब्यातून पोलिसांनी एक कार, तलवार, चार मोबाईल, टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शनिवारी (दि.२३) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भगवानराम गहलोत (वय २६), मुकेशकुमार मंगनाराम (वय २९), भावेशकुमार सुरेशकुमार (वय २१) आणि ऋतीककुमार भवरलालजी टाक (वय १९, रा.जालोर, राजस्थान) अशी अटकेत असलेल्या परराज्यातील आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेले चौघे कारने क्रांतीचौकातून उस्मानपु-याकडे जाताना झाशीच्या राणी पुतळ्याजवळ असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विजय निकम, अश्वलींग होनराव, ज्ञानेश्वर पवार, विशाल पाटील, आनंद वाहुळ, रितेश जाधव, नितिन देशमुख आदींनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये तलवार, चार मोबाईल, टॉमी, स्क्रू-ड्रायव्हर आदी मुद्देमाल मिळून आला. या टोळीविरूध्द मुंबईत पिस्टल लावून दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या टोळीविरुध्द उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या