लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करा-आ. सतिश चव्हाण

औरंगाबाद : लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करून याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. आ.सतीश चव्हाण यांनी नुकतीच मंत्रालयात राजेश टोपे यांची भेट घेतली.

लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना १९६९ मध्ये झाली असून सद्यस्थितीत याठिकाणी बाह्य व अंतररूग्ण संख्या २०० ते २५० च्या जवळपास आहे. पंचक्रोशीतील जवळपास ८० ते ९० खेडेगावातील रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र याठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ व सोयी सुविधांचा अभाव असल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे चव्हाण यांनी राजेश टोपे यांना सांगितले. तसेच लासुर स्टेशनच्या ३ कि.मी.अंतरावर वैजापूर तालुका व ६ कि.मी.अंतरावर कन्नड तालुक्याची सिमा असल्याने या दोन्ही तालुक्यातील जवळपास ४० ते ५० गावातील रूग्णांचा अतिरिक्त भार लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

नागपूर-मुंबई हायवे, नाशिक हायवे, व नव्याने होत असलेल्या समृध्दी महामार्ग याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. महामार्गावर दुर्देवाने आपघात झाल्यास अपघातग्रस्त रूग्णांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करून याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास परिसरातील, ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. राजेश टोपे यांनी देखील लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून त्वरीत आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP