महाराष्ट्राच्या विधानसभेत एकतरी तृतीयपंथी आमदार हवा ! : संजय राऊत

पुणे: आपला समाज बदलत असून तृतीयपंथी देखील आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. अनेक तृतीयपंथी आज समजासमोर आदर्श निर्माण करत आहेत. कोणी पोलीस बनत आहे, कोणी आयएएस त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही एक तृतीयपंथी आमदार हवा असल्याच म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तृतीयपंथीयांच कौतुक केल आहे. महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान व शिवसेना कसबा विभागाचे वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तृतीय पंथी व पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.

शिवसेना नेते बाळासाहेब मालुसरे यांच्यावतीने मंडईमध्ये या सन्मान सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते, यावेळी सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तृतीयपंथीयांचा संजय राऊत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये निर्भया संस्थेच्या चांदणी गोरे, सामजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी, राज्यातील पहिली तृतीयपंथी सरपंच माऊली कोंबले, पन्ना गाब्रेल, ऐश्वर्या बनसोड कवयित्री दिशा शेख, रंजिता नायर, रश्मी पुणेकर, संचिता पाटील, रिशिता मोरे आदी तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले यांच्या पागोट्यानेच स्वागत करायचं, असा आदेश दिला. तसेच त्यांनी छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडीने सन्मान करण्यात आला असतानाही दुसऱ्यांदा पोगोटे घालत सत्कार केला. पवार यांच्या याच कृतीचासमाचार संजय राऊत यांनी घेतला आहे.

ते म्हणाले कि, पवार हे कोणतीही कृती जाणूनबुजून करतात परवाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी असंच केलं. त्यांनी पुणेरी पगडी काढून त्याजागी पागोटे घातले, मात्र या पगडी खाली नेमकं दडलंय काय हे येत्या काळात स्पष्ट होईल. तसेच सर्वांनी पगडीचा सन्मान राखण गरजेचं त्यामुळे शरद पवारांनी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.