प्रवाशांच्या चाळ्यांमुळे तेजस एक्स्प्रेसमधील ट्रेन हॉस्टेस हैराण, प्रवाशांवर लादणार कडक नियम

blank

टीम महाराष्ट्र देशा : देशातील पहिलीवहिली खासगी तेजस एक्स्प्रेस मधील टवाळखोर आणि उचापतखोर प्रवाशांच्या चाळ्यांमुळे आयआरसीटीसीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाचा परिणाम या रेल्वेच्या सेवेवर झाला असून सध्या ट्रेन हॉस्टेसकडून फिडबॅक घेण्यात येत आहे. फिडबॅक आल्यानंतर अशा टवाळखोर प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही कडक नियम करण्यात येतील.

सध्या दिल्ली ते लखनऊ या शहरांमध्ये धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये विमानात दिल्या जातात तशा सर्व सुविधा दिल्या जातात. त्यासाठी या गाडीत ट्रेन हॉस्टेसही तैनात करण्यात आल्या आहेत. पण काही प्रवासी या ट्रेन हॉस्टेसशी गैरवर्तन करत असल्यामुळे त्यांना कसे रोखायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवाशांना सेवा पुरविताना काही प्रवासी या ट्रेन हॉस्टेससोबत विना परवानगी त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. तर मस्तवलेले महाभाग या ट्रेन हॉस्टेसकडे त्यांचा मोबाईल नंबरही मागत आहेत. या ट्रेन हॉस्टेस काम करत असताना काही प्रवासी त्यांचे व्हिडिओ शूट करतात. तर काही कारण नसताना सतत सीटजवळील बटण दाबून या हॉस्टेसना बोलावून त्रास देतात.

या प्रकारानंतरही सातत्याने ट्रेन हॉस्टेसशी सभ्यतेने वागण्याची सूचना प्रवाशांना करण्यात येत आहे. प्रवाशांना ट्रेन हॉस्टेसशी असे गैरवर्तन न करण्याचे आवाहन केले जात आहे. या गाडीत एकूण २८ ट्रेन हॉस्टेस असून आयआरसीटीसीचे पाच अधिकारी गाडीमध्ये प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून रोजच्या रोज त्यांना आलेल्या अनुभवांचा फिडबॅक घेतल्यानंतर प्रवाशांनी कसे वागले पाहिजे, याचे धडे त्यांना देण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :