कोरोनाबाधितांसाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये तात्पुरते रुग्णालय सुरु करा : एका मुंबईकराचे मोदींना पत्र

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये मोठमोठे रुग्णालये आणि यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहे. याचशिवाय आता ‘ रेल्वेच्या डब्यांचंही रुग्णालयात रुपांतर करण्याची मागणी मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील किरण कुपेकर यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून कुपेकर यांच्या पत्राची दखल घेत त्या पद्धतीचे उत्तर त्यांना देण्यात आलं आहे.

कुपेकर यांनी 25 मार्चला मोदींना हे पत्र लिहिले होते. कुपेकर यांनी लिहिलेल्या पत्रात रुग्णालयात असणाऱ्या अनेक गोष्टी रेल्वेच्या डब्यांमध्ये उपलब्ध असतात याकडे लक्ष वेधले आहे. “रेल्वे डब्यांमध्ये हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या बहुतेक सुविधा असतात. उदा. टॉयलेट, बेड इत्यादी जर काही रेल्वे डब्यांचं रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयात केले तर कमी वेळात एक फार मोठी यंत्रणा सज्ज करता येईल आणि संपूर्ण देशभर कुठेही गरजेनुसार पाठवता येतील. रेल्वेचे डबे विलगिकरणासाठी पण उपयुक्त ठरतील. याकरिता रेल्वे उपयोगी ठरेल”, अशा अश्याच पत्र किरण कुपेकर यांनी मोदींना पाठवले आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या आता 160 वर पोहोचली आहे. तर देशात 800 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात रहावी म्हणून आता भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे.

भारतीय रेल्वेकडून आता नॉन एसी ट्रेनच्या डब्ब्यात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंनटाईन केले जाणार आहे. तसेच येथे त्यांच्या औषधांची आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच “रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी केंद्रसरकारने परवानगी दिल्यास प्रत्येक आठवड्याला 10 डब्ब्यांचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केले जातील. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारला मदत मिळेल”, असं रेल्वेने सांगितले.