मुलांना उच्चपदस्थ अधिकारी बनवायचे स्वप्न दाखवून करायच्या तस्करी; तिघींच्या पोलिस कोठडीत वाढ

मुलांना उच्चपदस्थ अधिकारी बनवायचे स्वप्न दाखवून करायच्या तस्करी; तिघींच्या पोलिस कोठडीत वाढ

औरंंगाबाद : तुमची परिस्थिती हालाखीची असून तुझा मुलगा मला दे मी त्याला डॉक्टर विंâवा पोलिस अधिकारी बनवते असे स्वप्न दाखवून नंदा उदावंत, जनाबाई जाधव, सविता पगारे या तिघी मुलांची तस्करी करीत असल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. मुलांची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघींच्या पोलिस कोठडीत गुरूवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.मांजरेकर यांनी दिले आहेत.

पीडित मुलाचे आई-वडील आणि आरोपी नंदा उदावंत हे नातेवाईक असून नंदा उदावंत हिने देऊळगाव मही येथे पीडित मुलाच्या आई-वडीलांना बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने त्यांना तुमची परिस्थिती हालाखीची आणि गरिबीची असून तुझा एक मुलगा मला दे मी त्याला चांगले शिक्षण देवून डॉक्टर किंवा पोलिस अधीकारी बनवते अशी थाप मारली. त्यानंतर पीडीत मुलाला सुरेश लाखोले याच्यामार्फत जालना तहसील कार्यालयात जनाबाई जाधव व सविता पगारे यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर जनाबाई जाधव व सविता पगारे यांनी पीडित मुलाला औरंगाबादला आणले होते. लॉकडाऊन सुरू झाल्याने पीडित मुलाची आई नंदा उदावंत हिच्याकडे फोनवरून मुलाची चौकशी करायची त्यावेळी नंदा उदावंत ही तुझा मुलगा मजेत असून त्याची काळजी करू नको असे सांगायची.

दरम्यान, पीडित मुलाची आई ५ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे धुणी-भांड्याचे काम करण्यासाठी गेली असता त्यावेळी घरमालकाने त्याच्या मोबाईलवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवीता, त्यात पीडित मुलगा भिक मागतांना दिसत असल्याने पीडित मुलाच्या आईला धक्काच बसला. त्यानंतर दुस-याच दिवशी पीडित मुलाच्या आई-वडीलांना मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठुन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. अटकेत असलेल्या तिघींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर तिघींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तिघींच्या पोलिस कोठडीत गुरूवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

महत्त्वाच्या बातम्या