कास पर्यटकांमुळे यवतेश्‍वर घाटात ट्रॅफीक जाम

The Cas Plateau began to flowering season

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर सध्या विविध रंगी रानफुलांचा रंगोत्सव बहरला असून रविवारी ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला. त्यामुळे दुपारी 3 वाजल्यापासूनच साता-यातील बोगद्यापासून यवतेश्‍वर घाटात वाहनांच्या सुमारे 5 ते 6 किलोमीटर रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे दुपारपासूनच वाहने बंद करण्यात आली.

कास पठारावर सध्या 20 ते 25 प्रजातींच्या दुर्मिळ फुलांचा बहरास सुरूवात झाली आहे. शनिवार व रविवार जोडून सुट्ट्या आल्याने स्थानिक पर्यटकासह पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पनवेल, कोकण , कर्नाटकसह अन्य राज्यातील पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

रविवारी तर सकाळपासूनच कासवर फुले पाहण्यासाठी ओघ वाढला होता. अनेक पर्यटक स्वत:च्या वाहनाने तर काहींनी टुरिस्ट गाड्या करून कास पठारावर फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी गेलेले पर्यटक दुपारी 3 नंतर परतीच्या प्रवासाला लागले होते. त्यामुळे साता-याकडे येणा-या वाहनांची संख्या जास्त होती तर तेवढ्याच पर्यटकांच्या गाड्या कासकडे रवाना होत होत्या. मात्र दुपारी 3 नंतरच समर्थ मंदिर, बोगदा परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे यवतेश्‍वर घाटात कासकडून येणारी सर्व वाहने अडकली.