कडक निर्बंध मागे घेतले नाही तर उद्या आम्ही सर्वच दुकाने सुरू करू; व्यापाऱ्यांचा सरकारला इशारा

treader

पुणे – पुण्यातली दुकानं 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी आज आंदोलन केलं. पुणे व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील विजय चित्रपटगृह चौक ते कॉर्टर गेट अशी रस्ताच्या दुतर्फा मानवी साखळी करून आपला निषेध नोंदवला. सरकारने जर कडक निर्बंध मागे घेतले नाही तर उद्या आम्ही सर्वच व्यापारी मिळून दुकाने सुरू करू असा इशारा देखील या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या आंदोलनात सर्व लहान मोठे व्यापारी तसच हॉटेल व्यावसायिकही सहभागी झाले होते. एक वर्ष आधी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आम्हा सर्व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये पगार देखील देण्यात आले आहेत. आता कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर व्यवसाय सुरू होत होते. मात्र, पुन्हा लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आम्ही करायचे काय?असा सवाल यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या पुण्यात आढावा बैठक होणार आहे. त्यात शहर आणि जिल्ह्यातील वाढीव निर्बंधाबद्दल कोणता निर्णय होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 24 तासात 1 लाख 26 हजार 789 नव्या कोरोंना बंधितांची नोंद देशभरात झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत, दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील नवबाधितांच्या संख्येतील 80 टक्क्यांहून अधिक वाटा हा या 8 राज्यांमधील आहे.

देशात काल 685 रुग्ण मृत्युमुखी पडले त्यामुळे कोविड 19 आजारामुळे एकूण 1 लाख 66 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 9 लाख 10 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 91.67 शतांश टक्क्यावर खाली गेला आहे. कालच्या 24 तासात सुमारे 59 हजार जण बरे झाले. आत्तापर्यंत 1 कोटी 18 लाखांपेक्षा जास्त रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :