निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणारे पर्यटक अडकले मोठ्या संकटात

वाचा काय घडलं पर्यटकांसोबत

संदेश कान्हु(जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ;जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेले सात पर्यटक अचानक बंधाऱ्याचे पाणी सोडण्यात आल्याने सहस्त्रकुंड धबधबा परिसरात अडकले. त्या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस, वनविभागासह गावकऱ्यांना यश आले.

सहस्त्रकुंड येथून दीड किलोमीटर अंतरावर नवीन बांधलेला कोल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्यात  पाणी अडविल्याने सहस्त्रकुंडच्या पाण्याचा स्रोत कमी झाला होता. त्यामुळे पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्यातील खडकावर बसून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होते. परंतु, गुरुवारी (ता. 14) दीड वाजताच्या सुमारास बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने सहस्त्रकुंडमध्ये अचानक पाणी वाढले. त्यामुळे पर्यटक कुंडाच्या मधेच पाण्यात अडकून पडले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी पोलिस विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर इस्लापूर व बिटरगाव येथील पोलिस तत्काळ मदतीला आले. जवळपास तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करून सात पर्यटकांना बाहेर काढले. पोलिस प्रशासन, वनविभागाचे व उपस्थित गावकरी आदींनी या पर्यटकांना जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले.