माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा डिसेंबरपासून सुरू करणार : पर्यटनमंत्री जयकुमार रावल

Min Jaykumar Rawal at Malta Country press conf

मुंबई : भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात माल्टा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटन, सांस्कृतिक, आदरातिथ्य, शैक्षणिक, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रातील आदान प्रदान वृद्धिंगत होण्यात सहकार्य होणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माल्टा देशाचे पर्यटनमंत्री कोनरॅड मिझ्झी आणि पंतप्रधान कार्यालयातील सचिव तानिया ब्राऊन आदींसह शिष्टमंडळ सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव डी. के. जैन आदी मान्यवरांची भेट घेतली. त्यानंतर माल्टाचे पर्यटनमंत्री कोनरॅड मिझ्झी, मंत्री रावल आणि राज्यमंत्री केसरकर यांची मंत्रालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते.

पर्यटनमंत्री रावल म्हणाले की, माल्टा देश निसर्ग संपन्न देश असून या देशाची लोकसंख्या फक्त 4 लाखाच्या आसपास आहे. पर्यटन मोसमामध्ये माल्टा देशाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक (सुमारे 40 लाख) पर्यटक माल्टा देशात येतात. यामुळे पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा तुटवडा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील तरुणांना पर्यटन विषयक अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन माल्टा देशामध्ये रोजगारासाठी पाठविणे शक्य होणार आहे. येत्या डिसेंबरपासून माल्टा ते सिंधुदुर्ग चार्टर्ड विमानसेवा नियमित सुरु करण्यात येणार आहे. या विमान सेवेमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होऊन पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर म्हणाले, माल्टा देशासह चांगले नातेसंबंध असून, आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटरही उभारण्यात राज्य शासन सकारात्मक आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील खूप चांगले आणि महत्त्वाचे धोरण आहे. ग्रामीण भाग एकमेकांना जोडण्याचे काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही श्री. केसरकर यांनी यावेळी माल्टा देशातील शिष्टमंडळाला सांगितले.

माल्टा देशाचे पर्यटनमंत्री मिझ्झी यांनी माल्टा देशाचे धोरण आणि लोकसेवा याबद्दल माहिती दिली. भारतात पर्यटन, बॉलिवूड, वैद्यकीय पर्यटन, आदरातिथ्य, संवाद क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, माल्टा देशाच्या शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुख्य सचिव डी. के. जैन म्हणाले की, आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर लाभलेले महाराष्ट्र राज्य आहे. विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी माल्टा देश हा अधिक क्षमता असलेला आहे. राज्यात सुरक्षा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, अशा विविध क्षेत्रातील धोरण आखण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग येथे विमानतळ आणि तेथून माल्टा येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देते, जमीन स्थलांतरण, वीज वितरण यामध्ये सवलत देण्यात येते. मालमत्ता करातही सूट देण्यात येते. कामगार कायदेही शिथील आहेत. मोठ्या शहरांशी या विमानतळावरून विमानसेवा, करसवलत, प्रवाशांसहित व्यापारासंबंधित मालवाहूतकही करण्यात येते, अग्निशमन दल, सुरक्षा दल या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

महिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी