पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी

blank

मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले, विस्मरण झालेल्या शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाईल. चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट टी- सिरीज आणि अजय देवगण फिल्म्स बॅनरखालील ओम राऊत दिग्दर्शित ऐतिहासिक कालखंडातील नाट्यरूपांतर चित्रपट आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्ती सहाय्यक आणि विश्वासू तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू आदी मान्यवर कलाकारांचा समावेश आहे.

या भागीदारीचा एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाने आपल्या समृद्ध वारशाचा गौरव साजरा करण्यासाठी जनतेला राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अजय देवगण यांचे सहकार्य घेतले आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजींसारख्या योद्धांच्या अद्भुत शौर्याची आठवण करून देणाऱ्या किल्यांना भेट देण्याचे अश्वासित केले आहे. अशा योद्ध्यांच्या आठवणी अजूनही महाराष्ट्राच्या मौल्यवान किल्यांमध्ये आहेत. यासाठी खालीलप्रमाणे एक को-ब्रँडेड टीव्हीसी तयार केली आहे जो टीव्ही, सिनेमा अॅडव्हर्टायझिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.