तोरणमाळ : वारंवार भेट द्यावी असं अहिराणी लोकांचं लाडकं हिल स्टेशन

किमया के : अहिराणी लोकांचं लाडकं हिल स्टेशन असलेलं ‘तोरणमाळ’ आपल्या बेहद्द सौंदर्याने निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत असतं, साद घालत असतं.महाराष्ट्राच्या उत्तर टोकास एखाद्या अभेद्य भिंतीसारख्या उभ्या असलेल्या सातपुड्याची शान असलेले तोरणमाळ हे खानदेशी लोक सोडता फारसे लोकांना माहीत सुद्धा नाही. तोरण नावाच्या दुर्मिळ फुलांची इकडे रेलचेल आहे यास खानदेशी भाषेत ‘माळ’ असे म्हणतात म्हणूनच या परिसरास तोरणमाळ हे नाव पडले.

या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला सव्वा मण कणकेचा रोट (गोल) तयार केला जातो, त्यावर स्वच्छ कोरे तलम कापड गुंडाळले जाते आणि खालून वरतून तो शिजवला जातो याचे वैशिष्ट्य असे की हा रोट व्यवस्थित शिजतो मात्र गुंडाळलेले कोरे कापड आणि धागा तसाच राहतो.रोटचा ज्या दिशेचा भाग जळलेला असेल त्या भागात दुष्काळ पडतो अशी तेथील आदिवासी लोकांची समजूत आहे यामुळेच दुष्काळाला तोंड देण्यासाठी व तो सुकर बनविण्यासाठी आधीपासूनच पूर्वतयारी केली जाते यातूनच त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी व दूरदृष्टीचे दर्शन घडते.

महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात महाबळेश्वरनंतर दुस-या क्रमांकावर असलेलं तोरणमाळ समुद्रसपाटीपासून एक हजार ७६ मीटर उंचीवर वसलेलं असून या पठाराचं क्षेत्रफळ ४१ चौरस किलोमीटर इतकं आहे.आदिम आदिवासी बांधव तोरणमाळचे मूळ रहिवासी आहेत. प्राचीन काळापासून अगदी मांडू राजा व युवनाश्व राजाच्या काळातही इथं आदिवासी राहत असल्याचे संदर्भ सापडतात. शहरी जीवनाच्या एकूण प्रवाहापासून ही माणसं अलिप्त आहेत.

सर्वत्र कालबाह्य झालेली वस्तू विनिमयाची पद्धत (वस्तूच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण) प्लॅस्टिक मनीच्या आजच्या युगातही दिसून येते. पारदर्शकता इथल्या आदिवासींमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा आहे. दुर्मिळ वन्यपक्षी, प्राणीही इथं वास्तव्याला आहेत. अस्वलांचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही इथं आपलं दर्शन दिल्याचं सांगितलं जातं. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्याठिकाणी फारशी वर्दळ नसते.

तोरणमाळला प्रेक्षणीय स्थळे पुढीलप्रमाणे आहेत:- सीताखाई पॉईंट, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, आमदरी पॉईंट, गोरक्षनाथ मंदिर, कृष्णकमल तलाव, नागार्जुन मंदिर, मच्छिंद्रनाथ गुफा, सात पायरी घाट, यशवंत तलाव

तोरणमाळला पोहोचण्यासाठी मुख्य रेल्वे मार्गांवरून बसेस आहेत हे मार्ग पुढीलप्रमाणे :
शहादा-तोरणमाळ 55 किमी
धुळे-तोरणमाळ 140 किमी
नंदुरबार-तोरणमाळ 92 किमी

या स्थळाचा विकास फारसा झालेला नसल्याने सध्या ‘क’ श्रेणीत समावेश आहे ‘ब’ श्रेणी मिळविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची निराशा होणार नाही इतकी निसर्गाची मुक्त हस्तांची उधळण तोरणमाळला आहे त्यामुळेच पर्यटक एका अनामिक ओढीने त्याच्याकडे ओढले जातात ,आदिवासींच्या जनजीवनाचे इतक्या जवळून दर्शन घेऊन पर्यटनाच्या धुंदीत आलेले संवेदनशील पर्यटक काहीसे भावनाशील होतात आणि तोरणमाळच्या कायमचे प्रेमात पडतात.