उद्याची सकाळ शेकापचीच !

टीम महाराष्ट्र देशा :  शेतकरी कामगार पक्षाला एक वेगळा इतिहास आहे. अनेक लढे, आंदोलने केली. या आंदोलन, लढ्याच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी कष्टकरी, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेकापच्या विचारांशी प्रेरित होऊन असंख्य तरुण शेकापकडे येऊ लागले आहेत. देशात राज्यात सुरु असलेल्या जातीयवादी राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. सर्व समविचारी पक्ष, संघटनांनी एकत्र येऊन राज्यात, देशात वेगळे काम करण्याच्या भूमिकेत आहेत. आजवर जे हाल झाले आहेत ते आता संपणार आहेत. उद्याची येणारी सकाळ ही शेतकरी कामगार पक्षाचीच असणार असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.

महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुण पिढी 70 वर्षापूर्वी तयार झाली. शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. बहुजनांसाठी आवाज उठवून त्यांना हक्क, न्याय मिळवून दिला. हा आवाज थांबला होता. परंतु सत्यशोधक समाजाने बहुजनांसाठी लढा देण्यास सुरुवात केली. जो विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष काम करतो, तो विचार घेऊन पुरोगामी विचारातून कार्यकर्ते तयार झाले.
पुरोगामी विचारांचे, बहुजनांचे विचार पुन्हा आणायचे आहेत. त्यासाठी तरुणांना एकत्र करण्याचे काम करणे आवश्यक आहे. शेकापचा 70 वर्षाचा वारसा कार्यकर्त्यांनी पुढे न्यायचा आहे.

मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही शेकापची भूमिका असून त्याला पाठींबा आहे. उद्याची सकाळ ही शेकापचीच आहे. यातून नवी उर्मी व तेज मिळणार आहे असे आ. जयंत पाटील म्हणाले.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन 2 ऑगस्ट रोजी भाई उद्धवराव पाटील नगर, कर्णपुरा मैदान, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता या वेळी आमदार जयंत पाटील बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. गणपतराव देशमुख म्हणाले की, भाजप सरकार सत्तेवर येण्याआधीपासून खोटी आश्वासने देत आले आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हे सरकार कधीच पूर्ण करणार नाहीत. शेतकऱ्यांसाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागणार आहे.

राज्यसरकारने लोकशाहीचे धिंडवडे काढले – अजित पवार

मराठ्यांना यश मिळणारच, राजू शेट्टींनी व्यक्त केला विश्वास