गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार ,शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

udhhav thakarey

टीम महाराष्ट्र देशा- गोव्यात भाजपाने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करुन लोकशाहीचा अपमानच केला होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. पर्रिकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे, अशी टीका सामनाच्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात ?
गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळली आहे. ते लवकर बरे व्हावेत व त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आमची आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे. पर्रीकर यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी गोव्यातील मंदिरांत अभिषेक, पूर्जाअर्चा करण्यात येत आहेत. चर्चमध्येही प्रार्थना सुरू आहेत. पर्रीकर हे भाऊसाहेब बांदोडकरांनंतरचे गोव्याचे एक प्रमुख व लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी गोव्याच्या जिवाची घालमेल सुरू आहे. पर्रीकरांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ढासळत आहे तसा त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन – चार मंत्र्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून गोव्याचे मंत्रिमंडळ जणू अतिदक्षता विभागातच दाखल झाले. प्रशासन अधांतरी व कामकाज बंद अशा निर्नायकी अवस्थेत गोव्यासारखे राज्य सापडले असून राजकीय अस्थिरतेने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. हे योग्य नाही. ‘‘भारतीय जनता पक्षात (गोवा) पर्रीकरानंतर कोण?’’ असा प्रश्न विचारला जात आहे. पर्रीकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. मुळात पर्रीकरांच्या नेतृत्वाखालचे सरकार हे
अल्पमतातील सरकार
आहे. 40 आमदारांच्या विधानसभेत भाजपला फक्त 14 जागा जिंकता आल्या. काँग्रेस व एन. सी. पी. युतीला 17 जागा मिळूनही त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यास विलंब लावल्याने भाजपास तोडफोड, सौदेबाजी करण्यास वेळ मिळाला. तेव्हाच्या काँग्रेसच्या गोवा प्रभारींनी गोवा राज्य जणू भाजपास विकले. त्यानंतर गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मोट बांधून भाजपने सरकार स्थापन केले व त्याचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना म्हणजे मनोहर पर्रीकरांना गोव्यात पाठवले. ही भाजपची, पर्रीकरांची सगळ्यात मोठी चूक होती, पण यावेळी पर्रीकरांचा सूर लागला नाही आणि गोव्याची गाडी व पर्रीकरांची प्रकृती घसरत गेली ती गेलीच. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व फॉरवर्ड पार्टी मंडळींनी विधानसभा निवडणुका भाजपच्या विरोधात लढवल्या होत्या हे इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आता भाजपचे सरकार अस्थिर करण्यामागे हेच लोक आहेत. म. गो. पक्षाचे ढवळीकर व फॉरवर्ड पक्षाचे सरदेसाई यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे व पर्रीकर प्रकृतीशी झुंज देत असताना काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. अर्थात गोव्याचे राजभवन भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे काँग्रेसने आमदारांची परेड केली तरी निर्णय त्यांच्या बाजूने लागेल याची खात्री नाही. मध्यंतरी कर्नाटकात
काँग्रेसने भाजपचा खेळ
बिघडवला. कारण तिथे झटपट हालचाली झाल्या व भाजपने पडद्यामागे सुरू केलेल्या कृष्णकृत्यांस ‘मीडिया’ने वाचा फोडली. न्यायालयातही प्रकरण गेले. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही. गोव्यात निवडून आलेला प्रत्येक आमदार थेट मुख्यमंत्री होण्याचेच स्वप्न पाहत तरंगत असतो. यामितीस गोव्यात डझनभर माजी मुख्यमंत्री ‘बेकार’ अवस्थेत फिरत आहेत व माजी मंत्र्यांची एक स्वतंत्र वसाहत निर्माण करावी अशी स्थिती आहे. मनोहर पर्रीकर यांनी पाच वर्षे राज्य सांभाळले, पण त्यांनाही भाजपास पूर्ण सत्ता दुसऱ्यांदा देता आली नाही. पर्रीकर यांनी ज्यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले ते लक्ष्मीकांत पार्सेकर विधानसभा निवडणुकीत दारुण पद्धतीने पराभूत झाले. भाजपचे निम्मे मंत्रिमंडळ गारद झाले. अशा परिस्थितीत गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे.