पालघर आणि भंडारा – गोंदिया पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

पालघर: पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार असून, या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल.दरम्यान पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेना व भाजप नेत्यांनी एकमेकांचे वाभाडे काढले. आजवर कधी न पाहिलेला शिवसेना- भाजपमधील सत्ता संघर्ष पालघरमध्ये पहायला मिळाला. राजकीय स्वार्थासाठी मित्र कशे शत्रू होतात हे राज्याने नाही तर देशाने अनुभवले. ३ आठवड्यांपासून शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उतरले. काल (शनिवारी) सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून आज मतदान होणार आहे.

पालघर पोटनिवडणुकीसाठी शिवसेने कडून, भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आरोप – प्रत्यारोपाचं राजकारण चांगलचं रंगतांना पाहायला मिळालं.

शिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटतांना पकडून व व मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सीडी ऐकवून, प्रचाराच्या अंतिम चरणात विजयी षटकार खेचला. मुख्यमंत्री अहंकारी आहेत, भेसळीचे रक्त, भगवे रक्त अश्या प्रकारे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर शाब्दिक वार केले. दरम्यान भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.