लवकरच आम्ही सबरीमाला मंदिरात प्रवेश करु : तृप्ती देसाई

टीम महाराष्ट्र देशा- सबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. याविरोधात इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २००६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला. घटनापीठात न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. चार विरुद्ध एक अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला.
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या निर्णयाचं स्वागत केलं असून हा राज्यघटनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच लवकरच आपण सबरीमाला मंदिरात प्रवेश करु असं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी तारीख सांगितलेली नाही.

सबरीमाला मंदिर प्रकरणात न्यायालय महिलांच्या बाजूनं निकाल देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयानं आपला रोख स्पष्ट केला होता. मंदिर प्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचं दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असं न्यायालयानं सुनावणी म्हटलं होतं. यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज सुनावण्यात आला.