Science Day: आज राष्ट्रीय विज्ञान दिन

देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सरकारने त्यावेळचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकरांकडे यासाठी सुयोग्य दिवस कोणता याची चौकशी केली. डॉ. गोवारीकरांनी कोणाचा जन्मदिन-मृत्युदिन न निवडता भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला; तो दिवस म्हणजे आजचा विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. 1987 सालापासून आजतागायत 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
पदार्थावर प्रकाशकिरण टाकले असता पदार्थाची संरचना व गुणधर्मानुसार त्यांचे विकिरण (Diffractc) होते. सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी आपल्या के. एस. कृष्णन, के. आर. रामनाथन व अन्य सहकाऱ्यांबरोबर विविध पदार्थावर प्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणावर संशोधन केले होते.
चंद्रशेखर वेंकट रामन यांचा परिचय :
जन्म 7 नोव्हेंबर 1888, मृत्यू 21 नोव्हेंबर 1970
सर सी. व्ही. रामन या नावाने प्रसिद्ध.
जन्मताच हुशार असलेल्या रामन यांनी 1901 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1904 मध्ये बी.ए. भौतिकशास्त्र या विषयामध्ये सुवर्णपदकांसह पहिल्या क्रमांकाने पूर्ण केले. त्यानंतर 1907 मध्ये एम.ए. उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले. 1917 मध्ये कोलकता विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचवेळी “इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेमध्ये संशोधन सुरू केले. पुढे ते संस्थेचे सचिव झाले.
  • काय आहे ‘रामन-परिणाम’? :
रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. त्या पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता, त्यांना प्रकाशाच्या तरंगलांबीत बदल झालेला दिसला. पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमाच्या अणूत किंवा रेणूत प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची अणूत किंवा रेणूत आंतरक्रिया होते. अणुरेणूंतील ऊर्जास्तरात बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसले तर शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जति केली जाते.
विकिरित प्रकाश हाही ऊर्जा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. विकिरित प्रकाशाची तरंगलांबी (वेव्हलेंथ) मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. त्यानुसार विकिरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अतिक्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून आणि त्यांच्या दीप्ती (इंटेसिटी) वरून अणुरेणूंमधील ऊर्जेच्या स्तराविषयी माहिती मिळते. रेणूतील वेगवेगळ्या अणूंमधील बंध कशा प्रकारचे आहेत याचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे रेणूंच्या संरचनेचे आकलन होऊ शकते. प्रा. रामन यांनी ही बाब प्रत्यक्ष पुराव्यानिशी ती सिद्ध केली.
  •  या संशोधनानंतर प्रकाशाच्या विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधी, रचनेविषयी भांडार खुले झाले.
  •  रासायनिक संयुगाची रचना ठरविण्यामध्ये रामन परिणामाची मोलाची मदत झाली. दोन हजारापेक्षा अधिक रासायनिक संयुगांची रचना निश्‍चित करणे शक्‍य झाले.
  •  पुढे लेसर किरणांचा शोध यातून लागला. पुढे दोन वर्षांत झालेली दहा हजारांपेक्षा अधिक संशोधने रामन परिणामावर अवलंबून होती.
  •  आपल्या रोजच्या जीवनातही सिग्नलच्या दिव्यांचे रंगासारख्या अनेक बाबी या प्रकाशाच्या विकिरणानुसार ठरवलेल्या असतात.
  •  हा शोध त्यांनी ‘नेचर’ या ब्रिटिश नियतकालिकास फेब्रुवारी 1928 मध्ये पत्राद्वारे कळविला. रामन यांचे हेच संशोधन ‘रामन-परिणाम’ या नावाने जगद्विख्यात आहे. या शोधाकरिता त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला.