शरद पवार आज साताऱ्यात, उदयनराजें विरोधात ठरणार राष्ट्रवादीची रणनीती

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर पवार यांचा हा पहिलाच सातारा दौरा आहे. आगामी काळात उदयनराजे यांची राजकीय कोंडी करण्यासाठीची रणनीती आज ठरणार असल्याचं बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप – शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड व परभणीमध्ये त्यांनी मेळावे घेतले आहेत. यावेळी पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यामध्ये आजच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा खासदार झालेले उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भाजपवासी झाले आहेत. वाईतून मदन भोसले आणि माणमधून जयकुमार गोरे यांनाही पक्षात घेऊन भाजप आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेरीस आणण्यात यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शरद पवार राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच साताऱ्यात आता पोटनिवडणुक होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकीचा रणसंग्राम पाहिला मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचा सातार दौरा आज लक्षवेधी ठरणार आहे. इथून मागच्या दौऱ्यांमध्ये पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा चांगलाचं समाचार घेतला. त्यामुळे पवार आज उदयनराजेंच्या पक्षांतरावर काय भाष्य करणार हे पाहण ही औत्सुक्याच ठरणार आहे.