शेतकरीकन्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, सरकारचा अजूनही कानाडोळाचं

टीम महाराष्ट्र देशा : दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या तीन शेतकरीकन्यांनी ‘किसान क्रांती’च्या वतीने अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस असून शुभांगी जाधव हिची प्रकृती बरीच खालावली आहे त्यामुळे तिला अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. अनिश्चित पर्जन्यमान , वेळोवेळी करावा लागणारा दुष्काळाचा सामना , बँकांची शेतीसाठी घेतलेली कर्जे , नेहमीच तोट्यात नेणारा बाजारभाव यासाऱ्या कारणांमुळे शेतकरी भरडला जात आहे. तसेच सरकारची बेताल व अविश्वसनीय आश्वासन यासाऱ्या प्रकारामुळे शेतकरी कुटुंब हे नेहमीच दारिद्र्य रेषेच्या जवळ भटकत असते. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या तीन कन्यांनी गेले चार दिवस झाल अन्नत्याग आंदोलन केले आहे. आतापर्यंत उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भेट दिली.

शुभांगी जाधव यांची प्रकृती बरीच खालवल्याने त्यांच्यावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असले तरी उपोषण सोडणार नाही अस शुभांगी यांनी सांगितल आहे.