आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन; पवारांच्या भाषणाची उत्सुकता, सोशल मीडियाद्वारे साधणार संवाद

मुंबई : दोन महिन्यांच्या आजारपणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पवार नव्याने काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी २२ वर्षांच्या राजकीय वाटचालीत काँग्रेससोबत सलग १५ वर्षे राज्यात सत्तेत राहिली. २०१४ ते २०१९ काळ वगळता पुन्हा पक्ष सत्तेत आहे. सतत सत्तेत राहिल्याने पक्षसंघटनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी पक्षाने आता कंबर कसली आहे.

शरद पवार यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर राजकीय वर्तुळालाच नव्हे, तर राजकारणाची जाण असलेल्या सर्वसामान्यांनाही अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर आकाराला आलेल्या महाविकास आघाडी सरकारमागे पवारांचं बुद्धीचातुर्य होतं, हे सर्वश्रुत आहे

काँग्रेसमधून निलंबित झाल्यावर राष्ट्रवादीची मोट बांधली

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष स्थापनेचा दुसरा प्रयत्न होता. त्यापूर्वीही त्यांनी असाच एक प्रयत्न केला होता, मात्र तो फार काळ तग धरू शकला नाही.

समाजवादी काँग्रेसचा प्रयोग

शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्षही स्थापन केला होता. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. या काळात शरद पवार विरोधी पक्षनेते झाले होते. मात्र हा पक्ष १९८६ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला.

दरम्यान, यंदा २२ वा वर्धापन दिन साजरा करताना युवकांच्या संघटनेवर भर दिला जाणार आहे. स्थानिक पातळीवर युवा नेतृत्वाला संधी देण्याची मोहीम राष्ट्रवादी हाती घेणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून राज्यातले आघाडी सरकार लवकरच जाईल, असे दावे सतत केले जातात. त्यामुळे शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे आघाडी सरकारबाबत विश्वास देतात ते पाहणे औत्सुक्याचे आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

IMP