fbpx

भारताची आज सत्वपरीक्षा, ओव्हलवर रंगणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर आज भारताचा विश्वचषकातील २ रा सामना ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होत आहे. त्यामुळे या विश्वचषकातले ऑस्ट्रेलिया हे भारतासाठी कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे भारत आता या आव्हानाला कसा सामोरा जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर भारतीय संघाने देखील जोरदार तयारी केली असून ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे.

गेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारत विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाने देखील अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी विश्वचषकातील महत्वपूर्ण सामन्यांपैकी एक ठरणार आहे.

दरम्यान आजच्या सामन्यासाठी संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बाहेर राहिलेल्या मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि शमीच्या वेगवान माऱ्याच्या बळावर आॅस्ट्रेलियावर दडपण आणण्याचे भारताचे प्रयत्न असतील.तसेच केदार जाधवची गोलंदाजी ओव्हलवर प्रभावी ठरणार नसल्याची शक्यता आहे. येथे चेंडूला अधिक उसळी मिळते. फलंदाज त्यावर सहजपणे फटका मारू शकतो. अशावेळी अलगद मारा करण्यासाठी विजय शंकरचे नाव पुढे येऊ शकते.त्यामुळे संघात योग्य ते बदल करून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाला कशापद्धतीने समोर जाणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.