अन्नदाता आजपासून पुन्हा संपावर

मुंबई : आजपासून राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाहीये.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे, अशी माहिती जन आंदोलनाचे अॅड. कमल सावंत, प्रदीप बिलोरे, मकरंद जुनावणे आणि लक्ष्मण वंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील २२ राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना आजपासून भाजीपाला, दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.