fbpx

24 वर्षांची प्रतीक्षा संपली, बीड जिल्ह्यात सेनेच्या नेत्याला मंत्रीपद लाभले  

मुंबई :  बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे, मलबारहिल येथील राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. यामध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे २ आणि आरपीआयला एक मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदावर नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

24 वर्षानंतर बीड जिल्ह्यातील सेनेच्या नेत्याला मंत्रीपद लाभले आहे. या पूर्वी सुरेश नवले यांनी आरोग्य राज्यमंत्री पद सांभाळले होते आता जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने शिवसेनेचे मंत्रीपद बीड जिल्ह्याला मिळाले आहे.दीर्घ प्रतीक्षेनंतर बीडमधून शिवसेनेने क्षीरसागर यांना मंत्रिपद दिल्याने बीड जिल्ह्यातील  शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

सहा दशकानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या रूपाने मिरज विधानसभा मतदारसंघास मंत्रिमंडळात स्थान  

तर दुसऱ्या बाजूला तब्बल  सहा दशकानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या रूपाने मिरज विधानसभा मतदारसंघास मंत्रिमंडळात स्थान मिळाले.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी 1957 झाली तत्कालीन मिरजमधून विजयी झालेले काँग्रेसचे आमदार गुंडू दशरथ उर्फ बॅरिस्टर जी डी पाटील यांना त्याकाळी  राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यानंतर तब्बल 62 वर्षांनी ही संधी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघास प्राप्त झाली.

सावंत यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद 

मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील रहिवासी आहेत. तानाजी सावंत यांच्या शपथविधीनंतर माढा तालुक्यात फटाक्यांच्या आतशबाजीसह मोठ्याप्रमाणात जल्लोष करण्यात आला. शिवसैनिक शहरात ठिकठिकाणी जल्लोष करत आहे.माढ्याचे तानाजी सावंत हे यवतमाळ वाशीममधून विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.