नालासोपारा स्फोटक प्रकरण : जालन्यातून गणेश कपाळे ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा- नालासोपारा शस्त्रसाठा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. गणेश कपाळे याला औरंगाबाद एटीएसनं ताब्यात घेतले आहे. एटीएसने अटक केलेल्या आरोपी श्रीकांत पांगरकर याचा गणेश मित्र असल्याचं समोर आलं आहे.

आज सकाळी शनी मंदिर भागातून पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले. तो डीटीपी ऑपरेटर असून त्याचं जालन्यात झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे. गणेशच्या दुकानातून कॉम्प्युटर आणि हार्ड डिक्स पोलिसांनी हस्तगत केली आहे.

गणेश कपाळे शनि मंदिर चौकासह परिसरात सर्वपरिचित आहे. त्याला ताब्यात घेतल्याचा अनेकांना विश्वास बसत नसल्याचे चित्र होते. गणेश कपाळेचे आई-वडील तसेच अन्य नातेवाईकांसोबत भेट घेतली असता त्यांनी गणेश निर्दोष असल्याचे सांगितले. झेरॉक्स व डीटीपीसाठी कोणीही येऊ शकते. तो व्यवसायाचा भाग आहे. गणेश कोणत्याही कटात अथवा गैरप्रकारात सहभाग घेऊच शकत नसल्याचा दावा वडील मधुकरराव कपाळे यांनी केला.

‘या’ कारणामुळे झाला गणेश भूतकरचा खून