विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात – बापट

नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करुन तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना

पुणे :- हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सोमवार दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करुन तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी सूचना पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

मौजे पेरणे येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणा-या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस श्री.बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली, त्यावेळी उपस्थित विविध विभागाच्या अधिका-यांना त्यांनी ही सूचना केली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबुराव पाचर्णे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

श्री.बापट म्हणाले, विजयस्तंभास भेट देणा-या नागरिकांना आवश्यकत्या सर्व सोयीसुविधा द्याव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तेवढे टँकर, फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहीका तसेच वैद्यकीय अधिका-यांचे पथक, अग्नीशमन दलाच्या गाडया, विद्युत पुरवठा, सी.सी.टी.व्ही यंत्रणा आदी सर्व सुविधा देण्यात याव्यात. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. आवश्यक असल्यास वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करावा. याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. याकरीता पोलीस प्रशासनाने स्वयंसेवकांनां प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घ्यावी.यावेळी विविध विभागांच्या अधिका-यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

You might also like
Comments
Loading...