गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आमच्यापासून सुरू करा – नवाब मलिक

टीम महाराष्ट्र देशा – गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. लोकांच्या मनात मुंडेंच्या मृत्यू बाबत शंका आहे. त्यात आता हॅकरच्या माध्यमातून या शंकेला दुजोरा मिळाला आहे, म्हणूनच राष्ट्रवादीमधील नेते त्याबाबतीत बोलले आहेत. मुंडेंच्या नावानं आम्हाला मतं नकोय. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला चौकशीची सुरुवात आमच्यापासून करायची असेल तर जरूर करा, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही,माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेईऩ आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल. केज तालुक्यातील नांदूरघाट येथील आयोजित मतदार संघातील विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणल्या, लुच्च्या लबाडांना आता मुंडे साहेबांच्या मृत्यूमध्येही राजकारण दिसतं आहे. जयंत पाटील म्हणतात की पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. हत्या झाली की नाही हा विषय आता तुमचा नाही. तुम्ही जर चौकशीची मागणी करत असाल तर सुरूवात तुमच्यापासूनच केली पाहिजे.

मी सीबीआय ऑफिसर नाही, मी हॅकर नाही, मी मुंडे साहेबांची लेक आहे. माझ्याविरोधात काही लोक खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत आहेत. ही बाब चुकीची आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारणात कधीही झालेले नाही असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या सगळ्या नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बिबिसीला दिलेल्या प्रतीक्रीयामध्ये ते म्हणले आहेत की, आम्ही गोपीनाथ मुंडेच्या हत्येबाबत राजकारण करत नाहीत. जनतेच्या मनात याबाबत शंका आहे आणि त्याला एखाद्या हॅकरनं दुजोरा दिला आहे, तर त्याबाबतीत आम्ही राजकारण करतो, असा होता नाही. हॅकर बोलल्यानंतर त्यांच्या भागातील लोकांच्या मनात आहे की, याबाबत चौकशी व्हावी.

मुंडेंच्या नावानं राजकारण करायचं, मतं मागायची आम्हाला काही गरज नाहीये. हॅकरच्या बोलण्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तिला आणखी वाव मिळाला आहे, विरोधक असताना एखादा विषय समोर आला तर त्याबाबतीत बोललं पाहिजे, असं त्यांनी पुढे सांगितलं.