सिंहगडच्या मारूती नवलेंच्या संपत्तीची चौकशी करणार – रविंद्र वायकर

ravindra vaykar

पुणे – सिंहगड एज्युकेशन संस्थेच्या प्राध्यापकांचे वेतन थकविल्याप्रकरणी संस्थाचालक मारूती नवले यांच्या संपत्तीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उच्च शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले. सिंहगड संस्थेतील प्राध्यापकांच्या थकित वेतनाचा तिढा सोडविण्यासाठी येत्या सात दिवसात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सिंहगड एज्युकेशन संस्थेत अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन गेल्या कित्येक वर्षांपासून संस्थेने थकविले आहे. याबाबत प्राध्यापकांकडून सातत्याने आंदोलने केली गेली आहे मात्र तरीही हा तिढा सुटलेला नाही. याबाबत प्राध्यापकांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यासह उच्च शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मात्र, वेतनाचा प्रश्न सुटत नसल्याने या प्राध्यापकांनी याबाबत निवेदन दिले असता त्यावर पत्रकारांशी बोलताना वायकर म्हणाले, प्राध्यापकांच्या थकीत वेतनाची गंभीर दखल घेऊन संस्थाचालक मारूती नवले यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांची येत्या सात दिवसात बैठक घेण्यात येईल व त्यात त्यांना याबाबच्या सूचना देण्यात येतील.