पवार साहेबांप्रति तुमच्या-आमच्या मनातील स्वप्न नियती पूर्ण करेल: धनंजय मुंडे

पुणे: लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल माहीत नाही पण तुमच्या आमच्या मनातील साहेबांच्या प्रति जे स्वप्न आहे ते कदाचित नियती पूर्ण करेल त्यासाठी आपण काम करावं असं म्हणत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं , यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची एकमुखाने घोषणा करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी मुंडे बोलत होते.

या बैठकीत बोलताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सत्ताधारी भाजप सेनेवर निशाना साधला. हल्लाबोल आंदोलन सुरू झालं तेव्हाच सत्ता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल संपले तेव्हा सत्ता पक्षातील मंत्री म्हणत आहेत आता आपलं काही खरं नाही असं म्हणत चिमटा काढला. ज्या जयाला अंत नसतो असा जयंत आता आपला अध्यक्ष आहे असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल माहीत नाही पण तुमच्या आमच्या मनातील साहेबांच्या प्रति जे स्वप्न आहे ते कदाचित नियती पूर्ण करेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.