“TIMING” चुकलेल्या शाळेची मुलं

 

त्या दिवशी मी शाळेत माझं काम करत बसलेले. एक दिवसानंतर दहावीची परीक्षा सुरु होणार होती त्यामुळे शाळेत तशी शांतताच होती. माझीही lectures आटोपली असल्याने तसा थोडा वेळही होता. तेवढ्यात माझ्या कॅबिनमध्ये टकटक झालं आणि मी तिथे पहायच्या आतच एक शिक्षिका लगबगीने रूममध्ये शिरल्या. थोड्या तणावातच दिसल्या काही विचारण्यापूर्वीच माझा हात घट्ट पकडत आणि जवळ ओढतच मला बोलल्या; “दिव्या madam जरा वरती १० विच्या वर्गात येताय का? एक मुलगा परीक्षा न देण्याच्या गोष्टी करतोय. तुम्ही समजावता का त्याला? प्लीज. तो कोणाचही ऐकत नाहीये.”

मी लगेच त्यांच्याबरोबर निघाले. चालता चालता त्यांना सहज म्हटलं कि घाबरून जाऊ नका. परीक्षेच्या टेन्शनने कधी कधी मुलं असं वागतात.

त्यासरशी त्या पटकन म्हणाल्या, ” नाही नाही. हा परीक्षेचा ताण नाहीये.”

मी विचारलं, “मग?”

तसा त्यांचा चेहरा अजूनच चिंताग्रस्त झाला. त्या म्हणाल्या, ” अहो madam काय सांगू? थोडासा गोंधळ झालाय आज शाळेत. तो मुलगा आमच्यावर चिडलाय. शाळेत आम्हाला मारायला त्याची गॅग घेऊन येण्याच्या गोष्टी करतोय. त्याच्याबरोबर त्याचे नेहमीचे साथीदारही वर्गात आहेत. टवाळखोर मुलं ! शेवटच्या दिवशीही त्रास दिलाय या पोरांनी. आम्ही काय करू आता ?तुम्हीच तुमच्या भाषेत समजवा. त्या ५-६ जणांना आम्ही वरती बसवून ठेवलंय. पालक पण आले आहेत त्यांचे. मात्र, मुलं तोडफोडीची भाषा करत आहेत. निदान तुमचं तरी ऐकतील”.

हे सगळं ऐकून काहीतरी वेगळ घडल्याची कल्पना आलेली होतीच. तसाही मला माझ्या मुलांवर विश्वास होताच. त्यांच्या मारधाडीवर, रागावर आणि बदलणाऱ्या मूड्सवर. पण आजच का हे सर्व उफाळून आलेल होत?

मी वर्गात गेले. मुलं खरोखरच बिथरली होती. आणि ‘तो’ मुलगा सारखा वर्गाबाहेर पडण्यासाठी धडपडत होता. तो बाहेर जाऊ नये म्हणून बाकीच्यांनी त्याच्याभोवती एक मजबूत ‘सुरक्षा कवच’ उभारलं होतं. शिक्षिका सुन्नपणे उभ्या होत्या. मला पाहताच लगबगीने “thanks” म्हणत बाहेरही पडल्या. तेही वर्गाच दार लावून.

शाळेच्या त्या वर्गाला युद्धभूमीच स्वरूप आलेलं होतं. फक्त एक ठिणगी पडायचा अवकाश होता. एका बाजूला मुलांचे पालक चिंताक्रांत होऊन बसले होते. आणि दुसऱ्या बाजूला हि सगळी ५-६ मुलं खाली माना घालून होती. ‘तो’ मुलगा तर मुठी आवळून तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. २ मिनिटं कोणीच काही बोललं नाही. शेवटी त्यातला एकजण उठून म्हणालाच; “ताई, जर ‘हा’ परीक्षा देणार नसेल तर आम्ही कोणीही देणार नाही. आधीच सांगतोय तुला. आम्ही त्याला साथ देणार.”

मी त्याला म्हटलं, “अरॆ, तुमच्या दोस्तीबद्दल मला शंका आहे का? पण असं झालंय तरी काय?”

“ते तू टीचरला विचार.त्या सांगतील तुला. नाहीतरी त्यांना आमची तक्रार करायला आवडतेच. सगळीकडे आम्हीच असतो ना मस्ती करत.” मगासपासून सगळ्यात मागे  बसलेला एकजण रागाच्या भरात म्हणाला.

“नाही तर काय? शाळेतल्या भिंती नाहीतरी ‘आम्हीच’ खराब केलेल्या आहेत, मुलीना आम्हीच फिरवलेल आणि चीडवलेल आहे, फळे आणि तक्ते आम्हीच खराब केलेले आहेत, पिकनिक ला दारूच्या बाटल्या आम्हीच नेलेल्या आहेत.” अजून एकाला कंठ फुटलेला होता.

मगासपासून शांत बसलेला “तो” आता पटकन उठला आणि म्हणाला; “दिव्या ताई; आता काहीही आम्हाला सांगू नकोस. आम्ही ऐकणार नाही. मी परीक्षा देत नाहीये. त्यांना काय करायचं ते करू देत. आम्ही घाबरत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवतात काय? येऊ देत पोलिस. पकडू देत आम्हाला. टाकू देत जेलमध्ये. नाहीतरी आम्ही फुकटच गेलोय न त्यांच्यासाठी. मग दहावी तरी का होऊ?” एवढं बोलून त्याने हुंदके द्यायला सुरुवात केली.

मीही ‘पोलिस’ शब्द ऐकून अजूनच गोंधळून गेले. त्यांचं ऐकून, त्यांना शांत करून पुन्हा त्यांना विचारल; “काय घडलं एवढ? पोलिस का येतील?”

एवढा वेळ शांत बसलेले पालक आता बोलायला लागले. “अहो! पोलिस येतील नाही….. तर येउन गेलेत आमच्या कार्ट्याना ओरडून. आतापर्यंत आमच्या खानदानात कोणी पोलिस पहिला नाही . ह्यांनी आमची इज्जत…..” एक आई रडत बोलली. “आता माझ्या नातवाला जेल मध्ये टाकलं जाणार का?” एकाच्या आजी काळजीने विचारत होत्या. त्या सर्वांना शांत कराव लागणार होतंच शिवाय मुलानाही सांभाळण्याची कसरत त्याचवेळी करावी लागणार होती.

पण ह्या सर्वात महत्वाची होती ती माझी मुलं. भेदरलेली, गोंधळलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली… हे सगळं त्यांच्या रागातून आणि अश्रूतून व्यक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. माझ्या मनात त्याचवेळी अनेक शंकांनी आणि अंदाजानी गर्दी केली होती. नक्कीच शाळेने माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलं होत.

माझा अंदाज शेवटी दुर्दैवाने खरा ठरला होता. त्या मुलांनी आणि पालकांनी सांगितलेला प्रसंग असा होता-

‘शाळेच्या दहावीच्या निरोप समारंभावेळी मुलांनी खूप धमाल केली आणि शेवटी घरी जाताना एका शर्ट वर स्वतःची नावे लिहिली. त्यांना तसं करताना एका शिक्षिकेने पाहिलं आणि तिला झाला प्रकार अत्यंत असंस्कृत वाटला. मुख्याध्यापकांना कळताच त्यांनाही  हा प्रकार अशोभनीय वाटला; कारण बऱ्याच मुलांच्या नावाच्या बाजुला मुलींची नावे होती. ह्यातून त्यांनी वर्गातल्या प्रेमी जोड्या शोधल्या आणि हस्ताक्षरावरून जुने शोध लावले. त्यातला एक शोध होता तो म्हणजे — शाळेच्या स्वच्छतागृहात इंग्रजीत लिहिलेल्या शिव्या ह्यांच्या हस्ताक्षरांशी जुळत होत्या (मुलांनी रागारागात मला सांगितल कि एवढं इंग्रजी त्यांना लिहिता आलं असत तर ती इंग्रजी विषयात पास झाली असती.) त्यातून शाळेने एक आगंतुक निर्णय घेतला तो म्हणजे ह्या मुलांच्या पालकांना बोलावण, मुलांची हॉल तिकिट्स जप्त करणं, आणि शिस्तभंगाची कारवाई म्हणून पोलिसांना बोलावण.

हाच गोंधळ झालेला होता. पोलिस मुलांना ‘पोलिसी भाषेत’ समजावून गेले होतेच आणि त्याचवेळी त्यांचे पालक मुख्याध्यापकांकडून ‘संस्कार’ निमुटपणे ऐकून घेत होते. ह्या सगळ्यात हि ‘गुन्हेगार’ मुलं त्यांच्या ‘पुढील पावलांची दखल’ शाळेला घ्यायला भाग पाडत होती.

शेवटी ह्या चांगल्या शाळेने आणि शिक्षकांनी एक मोठ्ठी चूक केलेली होतीच

“शाळेने मुलांबद्दलच टायमिंग चुकवलं होतं”

माझा जवळ जवळ दीड तास मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावण्यात गेला आणि मी मुलांचं मन वळवण्यात यशस्वी ठरले. सगळीजण मला परीक्षेला बसण्याच ‘Promise ‘ देऊन गेली. परीक्षा संपेपर्यंत मीही थोडी ग्यासवर होतेच. पण एकदाची आमची सगळ्यांची परीक्षा संपली.

आणि आम्हा सर्वांचा निकाल हि चांगला लागला. हि सगळी मुलं ४५-५०% पर्यंत पास झाली. अगदी ‘त्याच्या’ सकट. ‘तो’ तर माझ्यासाठी बोर्डातच झळकला होता.

आज हि सगळी ‘gang’ ११वि मध्ये असून मोठ्ठ होण्याच्या तयारीला लागली आहे. माझ्याकडे त्यांनी लिहून ठेवलेल्या त्यांच्या promise ची आठवण त्यांना पुन्हा झालीय. “५ वर्षांनंतरचा/ची मी…..” कोण असेल ह्या त्यांनी लिहून ठेवलेल्या चीठ्यांचे  reminders दर महिन्यांनी माझ्या facebook वर येत आहेतच. आणि माझ्याकडे जपलेल्या ह्या नात्यांचे ‘अनुबंध’ नकळत घट्ट होत आहेत.

एक मात्र खरं……………

“TIMING चुकलेल्या शाळेची हि मुलं स्वताच्या आयुष्याच TIMING कधीच नाही चुकणार!!!”

 

लेखिका

दिव्या नेरूरकर

समुपदेशन मानसशास्त्रज्ञ

[email protected]

 

 

( लेखकाच्या मताशी “महाराष्ट्र देशा ” सहमत असेलच असे नाही )