सिंहासनाच्या रक्षणासाठी भविष्यात तलवारी हातात घेण्याची वेळ- संभाजी भिडे

अहमदनगर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात सभेला सुरुवात झाली असून, या सभेला आरपीआय व इतर संघटनांचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

संभाजी भिडे गुरुजी म्हणाले , सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका करतील. त्यामुळे तुर्तास याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले.

अहमदनगरचा उल्लेख अहमदनगर न करता अंबिकानगर असा करावा असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले. भिडे म्हणाले, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मनाचे सिंहासन सव्वा वर्षात उभारण्यात येणार आहे. हे सिंहासन उभारून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापण्यात येईल. आपणाला हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने रामायण, महाभारत आणि मराठ्यांचा इतिहास वाचलाच पाहिजे असेही संभाजी भिडे म्हणाले.