fbpx

आजची परिस्थिती पाहता मनसे करणार बॉम्ब वाटप

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील भाजप विरोधी भूमिका मनसे विधानसभा निवडणुकीत देखील कायम ठेवणार आहे. त्याच इराद्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याचं सांगितल जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच मनसेने आता बॉम्ब वाटप असे लिहित पोस्टर पोस्ट केले आहे. दैनिक लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप’ असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर अभिजीत पानसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.’हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या’, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान राज ठाकरे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.