रंगभूमीवर पुन्हा एकदा टिळक आणि आगरकर

टिळक आणि आगरकर

पुणे:टिळक आणि आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारं नाटक २ ऑक्टोबरला पुण्यात सादर होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक कै. विश्राम बेडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्री ते मतभेद असा प्रवास आणि त्यामुळे होणारी दोघांच्या कुटुंबांची अवघडलेली परिस्थिती यांची सुरेख सांगड घालत नाटक एका निर्णायक स्थळी येते. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात टिळक आणि आगरकरांना एकमेकांच्या भेटीची ओढही समर्पकपणे चितारली आहे.

पूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वी या नाटकाचे बरेच प्रयोग झाले, नाटक गाजलं. परंतु त्यानंतर नाटकाचे अभिवाचनाचे कार्यक्रम सोडता प्रत्यक्ष सादरीकरण झाले नाही. नाटकाची विशिष्ट धाटणी, त्यातील राजकीय गाभा आणि टिळक व आगरकर ही दोन मोठी व्यक्तिमत्वे उभी करण्याचं दायित्व यामुळेही या नाटकाला कुणी स्पर्श केला नसावा.

टिळक आणि आगरकर दोघेही राष्ट्रवादीच ! राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा एवढाच त्यांच्या मतभेदतील विषय होता का? खरं तर काही विषयांपैकी हा एक विषय मानावा लागेल. या दोघांनाही राष्ट्राचं भलंच हवं होतं. सुधारणा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी हव्या होत्या. मात्र त्यांचे विचार, संस्कार हे स्वतंत्र होते. एक मात्र मान्य करायलाच हवं की या दोघा विचारवंतांच्या भांडणात जहाल असूनही टिळक शांत होते आणि आगरकर टीकास्त्र सोडीत होते. कसं आणि काय यासाठी अर्थात नाटक पहिलच पाहिजे. आजकाल अशी नाटकं रंगभूमीवर येत नाहीत, त्यामुळे या नाटकाची पुनर्निर्मिती निश्चितच धाडसाची म्हणावी लागेल.