राज्यातील तीन हजारांवर एसटी कर्मचारी निलंबीत

राज्यातील तीन हजारांवर एसटी कर्मचारी निलंबीत

एसटी कर्मचारी

मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गत दोन आठवड्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे धरणे सुरु आहे. यामुळे एसटीची चाके पूर्णपणे थांबल्याचे चित्र दिसत असताना एसटी महामंडळाने गैरहजर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे.

सोमवारपर्यंत राज्यातील एकूण २ हजार ९६७ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. मंगळवारी आणखी ८५ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. बुधवारी ही संख्या ३ हजार ५२ पर्यंत पोहोचली आहे.

या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे काही डेपोत कर्मचारी कामावर हजर होत आहेत. मंगळवारी राज्यात दिवसभरात विविध भागातून २३६ बस सुटल्याची माहिती महामंडळाने दिली.

आतापर्यंत राज्यभरातील एकूण ६४५ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. संप कालावधीतील वेतनही या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही. दरम्यान राज्यातील काही भागातून धावणाऱ्या एसटीची संख्या वाढली आहे. सोमवारी १९७ बस सोडण्यात आल्या असून त्यातून ४ हजार ८४८ प्रवाशांनी प्रवास केला होता. मंगळवारी मात्र २३६ बस सोडण्यात आल्या तर ४ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला.

महत्वाच्या बातम्या