अट्टल दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

पुणे – पुणे शहर आणि ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरणा-या तीन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

योगेश उर्फ टकल्या नवनाथ वजळे (वय-19 रा.लोणी काळभोर,घोरपडे वस्ती), गणेश विजय चिकाटे (वय-20 रा.रायवाड़ी रोड लोणी काळभोर) आणि सूरज आनंत जाधव (वय-19 रा.परळी वैजनाथ, बीड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी पुणे शहरातून 9 आणि ग्रामिण भागातून 4 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश उर्फ टकल्या याच्याजवळ चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लोणी काळभोर येथील घोरपडे वस्तीतून ही दुचाकी ताब्यात घेतली आणि योगेशला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गणेश चिकाटे आणि सूरज जाधव याच्या मदतीने आणखीही दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून इचर दुचाकी हस्तगत केल्या.

ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक (बारामती विभाग) पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी (हवेली विभाग) सुहास गरुड़, पोलिस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनखाली सहा.पो.नि महेश ढवाण, पो.उप नि शिवाजी ननवरे, रॉकी देवकाते, समीर चमनशैख, परशुराम सांगळे, सागर कडु, अभिमान कोळेकर यांच्या पथकाने केली.