घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमध्ये खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. माछील सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला असून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या माछील सेक्टरमध्ये सुरक्षारक्षकांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला. तसंच काही दहशतवादी लपून बसले असल्याचा संशय लष्कराला असल्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागातल्या हाजीन येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री उशिरा लष्करी तळावर हल्ला केला. १३ राष्ट्रीय रायफल्स आणि हाजीन पोलीस ठाण्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे ४ ते ६ दहशतावाद्यांनी लष्करी तळ आणि पोलिसांवर गोळीबार सुरू केला. लष्कराने या संपूर्ण भागाला घेराव घातला आहे. सध्या दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे. आसपासच्या लोकांना घरातून बाहेर पडण्यास सैन्याने मज्जाव केला आहे. ४ ते ६ दहशतवादी या ठिकाणी अद्यापही  असल्याचा अंदाज सैन्याने वर्तवला आहे.