कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक

govind pansare

टीम महाराष्ट्र देशा : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे ईथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई इथल्या आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पानसरे हत्येमध्ये आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या 12 वर गेली आहे.

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली होती. शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती, असे एसआयटीने न्यायालयात सांगितले आहे.

दरम्यान कॉ. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये कोल्हापूरात गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून तपास करण्यात येत आहे.