महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारे तिघे अटकेत

ठाणे: नोकरीचे आमिष दाखवून महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या तीन जणांना अटक करण्यात आली. जयंती उर्फ आशा बालाजी यष्टी (३५) लक्ष्मी बाळकृष्ण बिस्ती (३१) नामदेव लिंपी जाधव (वय ६४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून बांगलादेश व पश्चिम बंगालमधून पाच महिलांना फूस लावून गेल्या वर्षभरापासून हनुमान टेकडी येथील वेश्यावस्तीत आणून कोंडून ठेवले होते. हे तिघे मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क करत असत आणि कोंडून ठेवण्यात आलेल्या महिलांना जबरदस्तीने या ग्राहकांशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी भिवंडीतील वेश्यावस्तीत धाड टाकत या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४ हजार ७३० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन व एक डायरी जप्त करण्यात आली आहे.