मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या; एकबोटे कुटुंबियांना धमकीचे पत्र

पुणे: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी येरवडा कारागृहात असणारे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबियांना धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे, यामध्ये एकबोटे यांच्या कुटुंबियांना तोफ्याच्या तोंडी द्या तसेच एन्काऊंटर करा, अशी धमकी देण्यात आली आहे. हे पत्र प्राप्त होताच मिलिंद एकबोटे यांचे भाऊ डॉ. गजानन एकबोटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली असून सध्या येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात एकबोटे यांना न्यायालयात हजर करण्यात आल होत, त्यावेळी एका युवकाने त्यांच्यावर हल्ला करत शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता एकबोटे यांच्या घरी थेट धमकी देणारे पत्र आल्याने कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात देखील अशाच प्रकारे धमकी देणारे पत्र त्यांना आले होते. दरम्यान, एकबोटे कुटुंबियांच्या तक्रारीची पोलिसांनी आता दखल घेतली असून पोलीस सरंक्षण देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.