हजारोंचा मोर्चा एकरकमी एफआरपीसाठी, प्रशासनाने शेतकऱ्यांना बसवलं कचऱ्यापाशी

blank

पुणे: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, ही मागणी करत आज खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांमधील आक्रमकता पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोर्चा बॅरिकेट लावत आयुक्तालयापासून एक किलोमीटरवर अंतरावर रोखला. यावेळी शेतकऱ्यांना अडवण्यात आलेल्या जागेवर असणारी महापालिकेची कचराकुंडी ओसंडुन वाहत होती. संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण होते. यावर आक्षेप नोंदवत प्रशासन शेतकऱ्यांना हीन वागणूक देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील साखर आयुक्तालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे, खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

पुण्यातील अलका टॉकीज चौकापासून निघालेला मोर्चा साखर आयुक्तालयवर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी केलेल्या बॅरिकॅडींगमूळे शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं. आपल्या न्याय मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने मोर्चा काढून देखील शेतकऱ्यांना अडवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ऊसदर अधिनियम 1966 नुसार 14 दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याच्या कायदा आहे. मात्र तीन महिने होऊनही थकीत एफआरपीची रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे जोपर्यत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही तसेच ती थकवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा, इशारा खा. शेट्टी यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिला.