ज्यांना आरोप करायचेत त्यांनी करावेत, माझे लक्ष विकास कामांकडे; प्राजक्त तनपुरेंची शिवाजी कर्डिलेंवर टीका!

tanpure

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पकडण्यात आला होता. नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली होती.

राजकीय मंत्र्याच्या दबाव असल्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप कर्डीले यांनी केला होता. दरम्यान, बनावट डिझेल प्रकरणाचा आणि माझा दुरान्वयानेही संबंध नाही. त्याबाबत करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून, ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावेत, माझे लक्ष विकास कामे करण्याकडे आहे, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.

ना.तनपुरे राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर होणार्‍या आरोपांकडे मी लक्षही देत नाही. माझे लक्ष पुर्णत: विकास कामांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चुकीचे काम करत असलेल्यांना पाठीशी घालत नाही.

ज्यांच्यावर आरोप आहेत, त्याचा निर्णय कोर्टात होईल. तसेच २३ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय असला तरी स्थानिक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. परिस्थिती गंभीर असलेल्या ठिकाणी नंतर शाळा सुरू केल्या तरी चालणार आहे.

ज्यांना विद्यार्थी शाळेत पाठवायचे आहेत, त्यांनी पाठवावे; मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी मागील सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत.

आमचे सरकार अगोदर तिकडे लक्ष देणार आहे. या सुविधा उभ्या करून लोड येत असलेल्या ठिकाणी विभागणी करून वीज पुरवठा सुरळीत आणि नियमित राहील, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या