ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन

मोदी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह अन्य मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यांमध्ये लसीकरण मोहीम, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये भाजपनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यात 71 ठिकाणी होमहवन, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून हा दिवस सेवा समर्पण अभियान म्हणून साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी राज्यात 35 लाख जणांना लस देण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठरवलं आहे. कामगार आणि गरीब कुटुंबांना आरोग्य सुरक्षा देण्यासाठी विशेष मोहीमही आजपासून राबवण्यात येणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला मोफत लस उपलब्ध करून दिल्यानं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट म्हणून ज्यांनी लस घेतली नसेल, त्यांनी आवर्जून घ्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल केलं. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मोदींच्या वाढदिवसाची लसीकरणाशी सांगड घालत एक ट्विट केलंय. चला आपण सारे भारतीय पंतप्रधान मोदींनी गिफ्ट देऊयात आणि लसीकरण करुन घेऊयात असं मांडविया म्हणाले आहेत.

“चला लसीकरण सेवा करुयात आणि त्यांना (पंतप्रधान मोदींना) वाढदिवसाची भेट देऊयात. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी,” असं मांडविया यांनी म्हटलं आहे. खरं तर मांडविया यांनी गुरुवारी दुपारीच हे आवाहन केलं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या ओळखीतील, नातेवाईकांना आणि समाजातील सर्व घटकांना लसीकरणासाठी प्रेरणा द्यावी असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या