fbpx

उदयनराजेंच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना राजे शासन करतात- मुख्यमंत्री

udayan raje and cm

सातारा: छत्रपती उदयनराजे भोसले आज त्यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त आज साताऱ्यात जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. जे उदयनराजेंच्या नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात, अशी मिष्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी ते आमच्यासाठी एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे आहेत. तसेच जे उदयनराजेंच्य नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना राजे शासन करतात, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली. परंतु, एरवी उदयनराजे म्हणजे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही तमा न बाळगता आवाज उठवणारी व्यक्ती असल्याचे फडणवीसांनी म्हटले. उदयनराजे मला नेहमी भेटतात मात्र ते स्वत:साठी काही न मागता साताऱ्याच्या विकासाचीच मागणी करतात. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. असेही फडणवीस म्हणाले.

उदयनराजे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची केलेली मागणी आज त्यांच्या वाढदिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करत असल्याची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment